P. P. Sadguru Shree Ramakrishna Kshirsagar Swami

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व अत्याधुनिक विज्ञानयुगात मन:शांती हरवून बसलेल्या मानवाला शाश्वत सुखासाठी अध्यात्ममार्गावर चालण्याची गरज आहे. आजच्या काळात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी व भक्तांच्या उद्धारासाठी प. पू. सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी अवतार घेतला.

प. पू. गुरुदेवांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५, दिनांक १६ फेब्रुवारी १९३४ रोजी नगर जिल्ह्यात, पारनेर तालुक्यातील रायतळे या गावी झाला. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला, त्रिकालज्ञान झाले व त्याच क्षणी त्यांना आपल्या जीवनकार्याची कल्पना आली. काही दिवसांतच त्यांना भगवान श्रीदत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. भगवान शिवांपासून चालत आलेल्या गुरुपरंपरेतील स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन श्रीदत्तात्रेयांनी त्यांना अनुग्रह दिला आणि साधना करण्यास सांगितले. २५ वर्षे कठोर तपश्चर्या झाल्यानंतर श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी पुन्हा दर्शन दिले आणि ‘मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करून घ्यायचे आहे’ असा आदेश त्यांना दिला.

प. पू. सद्गुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची प्रचिती अनेकांना येऊ लागली. आर्त, अर्थार्थी, साधक असे सर्व प्रकारचे लोक सद्गुरूंच्या विभूतिमत्वापुढे नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी आले. त्यांच्या चरणी आलेल्या सामान्य भक्तांना गुरुसेवा म्हणून सद्गुरूंनी घरोघरी फिरून वेदकार्यासाठी भिक्षा मागावयास सांगितली. १९७४ साली श्रीदत्त देवस्थान न्यासाची स्थापना करून या न्यासाच्या माध्यमातून गुरुआज्ञेप्रमाणे वेदांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली.

श्रीगुरुदेव हे भगवान श्रीदत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी ईश्वरसाधनेत व्यतीत केले. वेदांमध्ये सांगितलेला धर्म आजच्या काळानुसार कसा आचरावा, हे श्रीगुरुदेव अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत असत. त्यात धर्म, कर्मकांड, उपासना, आचरण व इतरही अनेक विषयांचा परामर्श घेतला जाई. वेदविद्येचे महत्त्व सामान्य लोकांना समजावून सांगण्यासाठी आणि वेदाधिष्ठित धर्माचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी सत्संग मंडळे स्थापन करण्यात आली. श्रीदत्तसंप्रदायात भिक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या प्रथेनुसार श्रीसद्गुरूंनी भक्तांना घरोघरी जाऊन धर्मभिक्षा मागण्यास सांगितले. सत्संग मंडळांच्या मार्फत भिक्षेच्या माध्यमातून कार्य आकारात येऊ लागले. समाजातून दानाच्या रूपाने ओघ देवस्थानकडे येऊ लागला व भिक्षा मागणाऱ्याचा अहंकार कमी होऊन त्याचीही आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. अशा रीतीने गावोगावी स्थापन केलेल्या सत्संग मंडळांकरवी समाजाला आध्यात्मिक मार्गावर नेण्याचे कार्य सद्गुरुंनी सुरू केले.

प. पू. गुरुदेवांनी वेद, उपनिषद आणि अन्य धर्मग्रंथातील अत्यंत क्लिष्ट ज्ञान जिज्ञासू भक्तांना अगदी सोप्या सरळ शब्दांत समजावून सांगितलेले आहे.  शरण आलेल्या भक्तांना मानसिक आधार देणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने धर्म आचरायला शिकवणे, दैनंदिन जीवन कसे जगावे याचे सोपे व प्रासादिक मार्गदर्शन करून प्रापंचिक जीवन सुसह्य व सुखी होण्याचा मार्ग दाखवणे, सर्व विषयावरील शंका निरसन करून भक्तांना अध्यात्म आचरण्यास प्रवृत्त करणे असे मानवी जीवनाला उपयुक्त कार्य श्रीसद्गुरूंनी केलेले आहे.

उत्तम कार्य करणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत, भूकंपग्रस्त किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने पीडित असलेल्यांना मदत असे कार्य सद्गुरू आजीवन पडद्यामागे राहून आणि प्रसिद्धिपराङ्मुख राहून करत असत. श्रीसद्गुरूंचे चैतन्यरूपी वास्तव्य आणि त्यांच्या ग्रंथसंपदेतील मार्गदर्शन स्वरूपी अमृत आजही भक्तांना पावन करत आहे. त्यांचे वेदकार्य अखिल मानवी समाजाला निरंतर आधार ठरणार आहे. 

परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या दिव्यत्वाची खूण म्हणून श्रीदत्त देवस्थानच्या आवारात एकाच मुळीतून वड, पिंपळ व औदुंबर हे ब्रह्मा, विष्णू व महेशाचे प्रतीक असलेले देववृक्ष प्रकट झाले आहेत. याखेरीज प्रत्यक्ष भगवंताचे म्हणजे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे चरण या आश्रमात उमटले आहेत. या चिंतामणी पादुकांचे दर्शन वर्षातील ठराविक दिवशी म्हणजे गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, विजयादशमी, दिवाळी पाडवा, गुरुद्वादशी व गुरुप्रतिपदा या दिवशी घेता येते. प्रत्यक्ष भगवंताचे चरणकमल उमटल्याने नगर हे क्षेत्राचे ठिकाण झाले आहे.

श्रीसद्गुरूंचा वरदपिंड होता. त्यांना त्यांच्या कडक ब्रह्मचर्यामुळे, तपश्चर्येमुळे, सोवळ्यामुळे आणि धार्मिक वागणुकीमुळे विदेही अवस्था प्राप्त झालेली होती. विदेही अवस्था ही अध्यात्म मार्गातील शेवटची अवस्था असते. अशा अधिकारी पुरुषांमध्ये ईश्वरी शक्ती प्रकट होत असते. श्रीसद्गुरू या शतकातील अधिकारी व्यक्ती होते आणि जन्मानेच अवतारी पुरुष होते. अखंड तपश्चर्या व पावित्र्यामुळे त्यांची प्रज्ञा जागृत झाली होती म्हणूनच त्यांनी भक्तांना विविध विषयांवर वेळोवेळी प्रासादिक मार्गदर्शन केले आहे. भक्तांच्या अडी-अडचणी ते क्षणात सोडवत व कोणत्याही विषयांवरील प्रश्नांची उत्तरे ते सहज देऊ शकत असत. नीलकांती हे ज्ञानाचं लक्षण आहे. उत्स्फूर्त ज्ञान जेव्हा प्राप्त होते तेव्हा देहातून तेज बाहेर पडत असते. ज्या वेळी देहाला नीलकांती येऊ लागते त्या वेळी ज्ञान स्थिर होऊ लागते. १९९६ सालातील कृष्णाष्टमीपासून श्रीसद्गुरूंना 'नीलकांती' प्राप्त झाली होती आणि ती भक्तांच्या अनुभवाला सुद्धा आली. श्रीसद्गुरू अधिकारी, अवतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या देहावर ईश्वरी खुणा दिसून येत असत. श्रीसद्गुरूंच्या हाता-पायांवर शंख, पद्म, त्रिशूळ, चक्र, ध्वज इत्यादी ईश्वरी चिन्हे होती.

श्रीसद्गुरूंना ईश्वरी साक्षात्कार झाला असला तरी भक्तांसाठी त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. जेव्हा अवतारी पुरुष तीर्थयात्रा करतात तेव्हा तेथील तीर्थक्षेत्राला, देवतेला एक तेज येते. मूर्तीचे, त्या क्षेत्राचे मालिन्य दूर होऊन सामर्थ्य पूर्ववत होते. जेव्हा अवतारी पुरुष नद्यांमध्ये स्नान करतात तेव्हा नद्यांचे  पावित्र्य त्यांच्या स्पर्शाने वाढते. विविध तीर्थयात्रा करताना परिस्थितीनुरूप सायकल,  टांगा  यापासून ते  विमानापर्यंत विविध साधनांनी सद्गुरूंनी प्रवास केला. रेल्वेच्या गर्दी मधून प्रवास करताना सोवळ्याचा बाऊ न करता; मुक्कामी गेल्यानंतर स्नानादी कर्मे करूनच ते पुढील गोष्टी करत असत. संन्यासधर्मानुसार दुपारी प्रसाद भोजन घेऊनच ते आश्रमातून बाहेर पडत असत, कारण रस्त्याने कुठे एखादी अंत्ययात्रा  दिसली तर दुसऱ्या दिवशी स्नानापर्यंत काही अन्नप्राशन करता येत नसे .

श्रीसद्गुरूंची पहिली तीर्थयात्रा श्रीमन् नृसिंहसरस्वती यांच्या साक्षात्कारानंतर श्री क्षेत्र गाणगापूर येथे त्यांच्या गुरूंच्या बोलावण्याने, आज्ञेने सुरू झाली. पूर्वी तेथे कसलीही व्यवस्था नव्हती. नदीवर स्नान करून ते दर्शनाला जात असत. प्रत्येक वर्षी श्रीसद्गुरू परमगुरूंसाठी भरपूर सेवा, वस्त्रे वगैरे साहित्य नेत असत. गाणगापूरला जात असताना दरवर्षी तुळजापूरच्या भवानीमातेची पूजा करून मगच पुढे जात असत. अशा प्रकारे दर वर्षी तुळजापूर-गाणगापूर यात्रा सुरू झाली.

सन १९५९ पासून श्रीसद्गुरूंची श्रीक्षेत्र पंढरपूर-नृसिंहवाडी-कोल्हापूर अशी आनंदयात्रा सुरू झाली. श्रीसद्गुरूंच्या तपश्चर्या काळात पांडुरंगाने पहाटेच्या वेळी प. पू. सद्गुरूंना सालंकृत दर्शन दिले होते. प्रतिवर्षी श्रीगणेश जयंतीच्या अगोदर दोन दिवस सद्गुरू पंढरपूर येथे सेवेसाठी मुक्कामी जात असत. पंढरपूरहून निघून कृष्णानदीच्या तीरावर वसलेल्या नृसिंहवाडीस सद्गुरू जात. श्रीगणेश जयंतीस येथे श्रीगणेशयाग, ब्रह्मणस्पती सूक्त हवन करवून घेत असत. महापूजेच्या वेळी दुधाचा पवमान अभिषेक करत. वाडीहून श्रीसद्गुरू कोल्हापूरला कुलदैवत अंबाबाईच्या सेवेसाठी जात असत. प्रतिवर्षी १०८ लिटर दुधाचा अभिषेक अंबाबाईस ते स्वतः करत असत.

यात्रेच्या निमित्ताने श्रीसद्गुरू कुरवपूर, गुरुवायूर, मदुराई, रामेश्वरम्, नाथद्वारा, डाकोरजी, सोरटी सोमनाथ, गया, बद्रीनाथ, केदारनाथ, ओंकारेश्वर, उज्जैन, काठमांडू, भीमाशंकर, घृष्णेश्वर, कारंजा, वणी, जेजुरी, मांडवगण, वृद्धेश्वर, आळंदी, शिवथरघळ अशा अनेक क्षेत्री भक्तांबरोबर गेले.

श्रीसद्गुरूंचा तपश्चर्या काळ सुरू असताना भक्तश्रेष्ठ भिकुअण्णा खासनीस यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मुळशी जिल्ह्यातील आंदगाव येथे प्रतिवर्षी श्रीसद्गुरूंचा वर्धापनदिन साजरा होऊ लागला. नंतरच्या काळात विविध सत्संग मंडळांमार्फत क्षेत्राच्या ठिकाणी वर्धापनदिन साजरे करण्यात आले. त्याप्रमाणे वाराणसी, नीरा-नरसिंहपूर, हरिद्वार, तिरुपती, द्वारका, श्रीशैल्यम् अशा विविध क्षेत्री श्रीसद्गुरूंचे वर्धापनदिन साजरे झाले.

अशा विविध यात्रांबरोबरच मुंबई, वाशी, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जळगाव, पनवेल, राहुरी अशा विविध गावांतील सत्संग मंडळांना आशीर्वाद देण्यासाठी व तेथील लोकांना दर्शन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी श्रीसद्गुरू अवश्य जात असत.  या निमित्ताने जे लोक नगरक्षेत्री येऊन दर्शन घेऊ शकत नाहीत अशांना दर्शन, मार्गदर्शन मिळून गुरुसहवास मिळे व गुरुसंवाद घडत असे.

आद्य श्रीशंकराचार्य स्थापित चार पीठांपैकी शृंगेरी येथील शारदा पीठाचे पीठाधीश्वरांचे व श्रीसद्गुरूंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. १६ मार्च १९८२ साली शृंगेरी पीठाधीश्वर श्री श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामी धर्मसभेसाठी महाराष्ट्रात आले असता त्यांनी श्रीदत्तात्रेय निवासात वास्तव्य केले. १९८३ साली त्यांनी श्रीसद्गुरूंना नवरात्रातील शारदोत्सवासाठी शृंगेरीला येण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळी श्रीसद्गुरूंचे भव्य स्वागत शृंगेरी शंकराचार्यांनी केले. त्याच वर्षी श्रीशंकराचार्यांनी श्रीसद्गुरूंना स्फटिकाचे चंद्रमौलेश्वर शिवलिंग व शाळिग्राम दिला आणि महावस्त्राने श्रीसद्गुरूंचा सत्कार केला. १९८४ साली शृंगेरी पीठाधीश्वर श्री श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामी व त्यावेळचे शिष्यस्वामी श्री भारतीतीर्थ स्वामी विजययात्रेच्या निमित्ताने श्रीदत्तात्रेय निवासात परत वास्तव्यास आले. त्यावेळी त्यांनी श्रीदत्त देवस्थानात पाच दिवसांचा श्रीशंकराचार्य जयंती उत्सव साजरा केला. तसेच त्याच वेळी पुरी येथील गोवर्धन पीठाधीश श्री निरंजन स्वामी व द्वारका पीठाधीश श्रीस्वरूपानंद सरस्वती यांचेही श्रीदत्तात्रेय निवासात आगमन झाले. त्यावेळी श्रीशंकराचार्य जयंती उत्सव श्रीदत्त देवस्थानात सुरू करण्याविषयी शृंगेरी पीठाधीशांनी सांगितले. पुन्हा १९८५ साली श्री श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामींनी श्रीसद्गुरूंना शृंगेरी येण्याचे आमंत्रण दिले व त्या मुक्कामात आद्य श्रीशंकराचार्यांची पंचधातूंची मूर्ती श्रीसद्गुरूंना दिली. तेव्हापासून श्रीशंकराचार्य जयंती उत्सव देवस्थानात साजरा होऊ लागला. त्यानंतर १९९२ व १९९४ सालीही श्री श्री श्री भारतीतीर्थ महास्वामी यांचे देवस्थानात आगमन झाले आणि २००७ साली श्री श्री श्री भारतीतीर्थ महास्वामी यांच्या हस्ते श्रीदत्तक्षेत्रातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. श्रीसद्गुरूंबद्दल शृंगेरी पीठाधीश जगद्गुरू शंकराचार्यांना आपुलकी वाटत होती आणि ते त्यांचा उल्लेख ‘ब्रह्मचारीजी महाराज’ असा करत असत. आजही त्यांच्या दर्शनाला जाणाऱ्या श्रीसद्गुरूंच्या भक्तांना ते विशेष आपुलकीने वागवतात. अशा प्रकारे सर्व पीठांच्या शंकराचार्यांनी श्रीसद्गुरूंचे विभूतिमत्व ओळखले होते.

भगवान श्रीकृष्ण जन्माने आठवे आणि सद्गुरूही जन्माने आठवे. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांची जशी तुला झाली तशीच सद्गुरूंची तुला करण्याचे भाग्य भक्तांना लाभले. साठीशांतीच्या निमित्ताने २३ नोव्हेंबर १९९३ रोजी सद्गुरूंची रौप्यतुला सर्व भक्तांनी मिळून केली. श्रीदत्त देवस्थानातील लक्ष्मी मंडपात हा सोहळा अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला. देशभरातून आलेल्या सर्व भक्तांनी हा परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवला आणि ते धन्य झाले.  या निमित्ताने सर्व उपस्थित भक्तांचे कौतुक करून भक्तांना आशीर्वाद देताना अगदी सातव्या वर्षीच्या अनुग्रहापासून ते तोपर्यंतच्या वाटचालीबद्दल श्रीसद्गुरूंनी सांगितले व सरतेशेवटी भावनाप्रधान होऊन, ‘’तुम्ही या चरणाजवळ येऊन पोहोचले आहात. अन्यथा कुठलाही मार्ग पत्करू नका. ह्यातच तुमचा उद्धार होईल आणि तुम्हा सर्वांचे कल्याण होईल” असा आशीर्वाद त्यांनी भक्तांना दिला.

श्रावण वद्य १४ शके १९२१, दिनांक ८ सप्टेंबर १९९९ रोजी  श्रीसद्गुरूंनी आपला देह पंचतत्त्वात विलीन केला. परंतु शक्तिरूपाने ते आजही श्रीदत्तक्षेत्रात वास करून आहेत, याची प्रचिती भक्तांना सदैव येते. वेदकार्याबरोबरच नीतिमान समाज घडविण्याचे कार्य गुरुदेव आजही अव्याहतपणे करत आहेत. श्रीसद्गुरूंच्या नुसत्या दर्शनाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो व तो नकळत सत्प्रवृत्तीने वागू लागतो. संपूर्ण विश्वाला सुखशांतीच्या मार्गावर नेणाऱ्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचा हा यज्ञ प. पू. गुरुदेवांनी सर्वस्व त्यागून सुरू केला आहे. ह्या यज्ञात आहुती टाकण्याची संधी ते प्रत्येकाला देत आहेत. यातूनच अखिल मानवजातीचा उद्धार होणार आहे. त्यांची शक्ती आजही श्रीदत्त देवस्थानात वास करून आहे व भक्तांकडून अखंड कार्य करून घेत आहे.